पुणे – शहरातील नव्याने बांधकाम करण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये आता पार्किंगसाठी निश्चित केलेल्या जागेत वाहनसंख्येच्या 20 टक्के ई-चार्जिंग पॉइंट उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात शहरात मोठ्या प्रमाणात ई-वाहनांची संख्या वाढणार आहे. परिणामी, चार्जिंगची सुविधाही वाढविणे आवश्यक असून त्यासाठी महापालिकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
याबाबत आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. दरम्यान, याबाबतचा आदेश पुढील आठवडाभरात काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, शहरातील इतर कार्यालयांतही ही सुविधा उभारण्याबाबत विचार सुरू असल्याचे कुमार म्हणाले. भविष्यात वाढते हवा प्रदूषण रोखण्यासह पेट्रोल आणि डीझेलच्या पुरवठ्यावर असलेल्या मर्यादा लक्षात भविष्यातील पर्यायी इंधनाबाबतची परिषद नुकतीच पुण्यात झाली. या परिषदेत महापालिकेकडून पालिकेच्या ई-वाहनांचा भविष्यातील वापराचा आराखडा सादर करण्यात आला.
मोठ्या बांधकाम प्रकल्पांना मान्यता देताना वाहनांच्या पार्किंगची सुविधा उभारण्याचे बंधन आहे. त्यानुसार पार्किंगमध्ये असलेल्या एकूण वाहनांच्या तुलनेत 20 टक्के चार्जिंग पॉइंट असणे बंधनकारक असणार आहेत. हे पॉईंट उभारल्याशिवाय संबंधित विकसकास भोगवटा पत्र दिले जाणार नाही. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका