पुणे – देशाच्या वायव्येकडील राज्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून, त्यामुळे तेथून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ झाली आहे. बुधवारी पुणे शहरातील कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. पाषाण उपकेंद्रात बुधवारी या वर्षातील शहरातील सर्वाधिक 40.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात 1 ते 2 अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी “एप्रिल हिट’ ठरणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात 41 अंशापेक्षाजास्त तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उष्णेतेच्या लाटेची सर्वाधीक झळ विदर्भ आणि मराठवाड्याला बसली आहे. विदर्भातील वातावरण विषम असल्यामुळे कमाल आणि किमाण तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात 22.7 किमान तर अकोला जिल्ह्यात 44 अंश सेलिंसअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.