पुणे – वाघेश्वरनगर, सुयोगनगर बुरुंगवाडी व गाडीतळ येथील कामगारांच्या घराचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मी स्वतः तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन “एस.आर.ए’ प्रकल्प राबवणार आहे. नगरविकास खाते हे शिवसेनेकडे आहे त्यामुळे येथील कामगारांना, लोकांना विश्वासात घेऊनच याबाबतचे निर्णय घेतले जातील. कोणावरीही चुकीचे निर्णय लादले जाणार नाही, अशी ग्वाही शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
वाघोली गायरान वस्ती, सुयोगनगर, गोरेवस्ती, बुरुंजआळी, गाडीतळ तसेच वाघोली गावठाणातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधित लसीकरण ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी स्व: खर्चातून केले. याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी कटके बोलत होते. ते म्हणाले की, “एस.आर.ए’ प्रकल्पांतर्गत आपल्या सर्वांना स्वप्नातील घर साकारण्याची संधी मिळणार आहे. या प्रकल्पाला आपल्या सर्वांची संमती असेल तरच आम्ही या प्रकल्पातून आपणास घर मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. यासाठी नगरविकास खात्याशी बोलणार आहे. हे खाते शिवसेनेकडे असल्याने चिंता नाही. सगळ्यांना विचारात घेऊनच निर्णय घेऊ.
लसीकरणा विषयी कटके म्हणाले की, गोरगरिबांना लस देणे खूप महत्त्वाचे आहे. काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि लस मिळाल्याशिवाय काम नाही, अशी स्थिती असताना गोरगरीब जनतेला लसीकरणासाठी धावपळ करावी लागत आहे त्यामुळे मी तुमच्या दारापर्यंत लसीकरण केंद्र आणले आहे. प्रत्येक गोरगरीबाला लस दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अनेकांनी तुम्हाला खोटे सांगून फक्त मतापुरता उपयोग केला आहे. परंतु, मी इथून मागे ही तुमची कामे केली आहेत आणि यापुढेही करणार आहे.
दरम्यान, आजच्या लसीकरण मोहिमेमध्ये वागेश्वरनगर, सुयोगनगर, बुरुंगवाडी तसेच गाडीतळ येथील शेकडो कामगारांनी सहभाग नोंदवला. 600 जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी माननीय रामकृष्ण आण्णा सातव पाटील, सागर भाऊ गोरे, मारुती आण्णा गाडे, मा.उपसरपंच वाघोली, सुनील जाधवराव सामाजिक कार्यकर्ते, सुनील काळे, गणेश गोगावले, सुधीर दळवी, मंगेश सातव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पवार यांनी केले तसेच आभार मनोज पवार यांनी मानले.
आंबोचे खूप खूप आभार
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आबा कटके, रामकृष्ण सातव तसेच सागरभाऊ गोरे यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या वस्तीमध्ये आजपर्यंत कोणीही लसीकरण मोहीम राबविली नव्हती. आज खूप आनंद वाटत आहे आमच्या घरापर्यंत लसीकरण मोहीम आणली आहे. भविष्यात असेच अनेक वेगवेगळे उपक्रम आमच्या वस्तीमध्ये राबविण्यात यावे ही नम्र विनंती, असे युवा कामगार किसन यत्नाल यांनी सांगितले.