पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी किती सदस्यांचा प्रभाग असावा हा राज्य शासनाचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाने सुरू केलेले काम हे तयारीचा भाग असून दोन सदस्यीय प्रभागाबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. 3) बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवार हे दोनच्या प्रभागावर ठाम असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
पुढील वर्षी मार्च महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यातील मुदत संपुष्टात येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय पद्धतीने प्रारुप प्रभागरचनेचे आदेश दिले आहेत. परंतु, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभारचना करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आग्रही आहेत. राज्य सरकारच्या पातळीवर अद्यापपर्यंत दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निवडणूक एक सदस्यीय की द्विसदस्यीय याबाबत इच्छूक, राजकीय मंडळींमध्ये संभ्रम कायम आहे.
याबाबत पिंपरीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, यापूर्वी झालेल्या निवडणुकांच्या आधारे निवडणूक यंत्रणेने कामकाज सुरू केले आहे. त्यांच्याकडून प्रारुप प्रभाग रचना केली जात आहे. मात्र, महापालिका निवडणुकांसाठी एक, दोन किंवा किती सदस्यांचा एक प्रभाग असावा, हे निश्चित करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. सरकारच्या पातळीवर द्विसदस्यीय पद्धतीबाबत चर्चा होत आहे. लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच महापालिकेची निवडणूक होईल, असे संकेत पवार यांनी यावेळी दिले.
ओबीसी आरक्षणावर लवकरच तोडगा काढू
ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा आगामी महापालिका निवडणुकीवर परिणाम होणार आहे. त्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहे. यावर देखील सरकार गंभीर असून विचार करत आहे. बैठका सुरू असून निवडणुकांपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल.