पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाचा लहान मुलांसाठीच्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व मुलांना कोवॅक्सीनचा डोस दिला जाणार आहे.
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणी शनिवारपासूनच सुरू झाली होती. 50 टक्के ऑनलाइन आणि 50 टक्के ऑफलाइन असे नियोजन आहे. त्यामुळे 50 टक्के मुलांना “ऑन दि स्पॉट’ येऊन नोंदणी करता येणार आहे.
2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या को-विन पोर्टल किंवा ऍप्लिकेशनवर नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, लसीकरणाच्या प्रत्येक दिवशी सकाळी आठ वाजता नोंदणीसाठी स्लॉट ओपन होणार आहे. लसीकरणाला येताना लाभार्थ्याकडे आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अत्यावश्यक आहे.
सुमारे 40 केंद्रांवर हे लसीकरण होणार असून, प्रत्येक केंद्रावर 250 लसींचे नियोजन आहे. 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन किंवा तीन स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी सुमारे 10 हजार मुलांना डोस देता येईल, असे हे नियोजन आहे.
महापौरांच्या उपस्थितीत होणार मोहिमेला सुरुवात
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात सकाळी दहा वाजता मोहोळ यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात होईल.