पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे महत्त्वाचे निर्णय सर्वानुमते घेतले जाणार आहे. प्रदेश कॉंग्रेसचा निरीक्षक म्हणून महत्त्वाच्या निर्णयात मी स्वत: लक्ष घालणार आहे. गेल्या चार दिवसांच्या शहराच्या दौऱ्यात मी बहुतांश पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. आगामी निवडणुकीत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. त्याची दक्षता प्रदेश कॉंग्रेस निश्चितच घेईल, असे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा शहर कॉंग्रेसचे निरीक्षक संजय राठोड यांनी केले.
रविवारी (दि. 2) आकुर्डी येथे शहर कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राठोड बोलत होते. या प्रसंगी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शहर कार्याध्यक्ष ऍड. अनिरुद्ध कांबळे, कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, प्रदेश कॉंग्रेस ओबीसी सेल सरचिटणीस किशोर कळसकर, यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व वरीष्ठ नेते आदी उपस्थित होते.संजय राठोड यांनी ज्येष्ठ कॉंग्रेस कार्यकर्ते तसेच गेल्या सात वर्षांत कॉंग्रेसमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव केला.
राठोड म्हणाले की, शहरात पुन्हा कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणूक कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. याबाबतचे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुर्वीच दिले आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच काम करावे लागेल.
शहर दौऱ्याचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर करणार आहे. यानंतर सचिन साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ऍड. अनिरुध्द कांबळे यांनी स्वागत केले. गौरव चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पांढरकर यांनी आभार मानले.