पुणे – एकीकडे पुणे शहरात करोना प्रतिबंधक लसीचे विक्रमी लसीकरण झाले असले तरी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे मनपा हद्दीत सलग 75 तास लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कोथरूड येथील सुतार रुग्णालय या ठिकाणी हे लसीकरण होणार आहे.
देशभरात यंदा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. यात विविध उपक्रम राबवले जात असताना लसीकरण मोहिमेला व्यापकता देण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे मनपा हद्दीत सलग 75 तास लसीकरण उपक्रम राबवण्यात येत आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
संपूर्ण तीन दिवस रात्रंदिवस हे लसीकरण होणार आहे. प्रत्येक दिवशी तीन शिफ्टमध्ये या लसीकरणासाठी मनुष्यबळ काम करणार आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये पाच जणांचे पथक कार्यरत राहणार आहे. सुमारे 45 हजार सिरींज महापालिकेकडे सध्या शिल्लक आहे. तसेच या मोहिमेसाठी लागणारे डोसही महापालिकेकडे उपलब्ध असल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
याशिवाय आणखी सव्वालाख सिरींज खरेदीची ऑर्डर देण्यात आल्याचे डॉ. भारती यांनी नमूद केले. दरम्यान, या मोहिमेशिवाय रोजचे नियमित लसीकरणही सुरू राहणार आहे.ते लसींच्या उपलब्धतेनुसार नियोजित केंद्रांवर राहणार आहे, अशी माहिती लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.