पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विधानसभानिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी चिंचवड आणि रविवारी पिंपरी विधानसभेतील इच्छुकांची बैठक पार पडली. या बैठकीत ज्या इच्छुकांची बूथ प्रमुखांची रचना पूर्ण असेल त्यांनीच उमेदवारी मागायला यावे, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
“एक बूथ तीन यूथ’ अशी भाजपची बूथ रचना आहे. प्रत्येक बूथवर तीन कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाते. यात पुरुष आणि महिला यांचा सहभाग असतो. याप्रमाणे रचना केल्यास त्याचा प्रचारासाठी व निवडणुकीत मोठा फायदा होतो, असे सांगत बूथ रचना करणे बंधनकारक असल्याचे वरिष्ठांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
शनिवारी काळेवाडी फाटा येथे चिंचवड विधानसभा क्षेत्रातील महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची बैठक एका हॉटेलमध्ये पार पडली. बैठकीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे यांच्यासह 200 हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या प्रभागातील बूथवर प्रत्येकी तीन कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याची सूचना इच्छुकांना देण्यात आली आहे. ही रचना पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी इच्छुकांना देण्यात आला आहे. ज्या इच्छुकांची “एक बूथ तीन यूथ’ अशी रचना पूर्ण झाली असेल त्यांनीच उमेदवारी मागावी. ज्यांची रचना पूर्ण नसेल त्यांनी आगामी बैठकीलाही येऊ नये, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
केवळ नावापुरत्या बूथ प्रमुखाच्या नियुक्त्या करू नये. बूथप्रमुखाला आपल्या परिसराची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे आहे. तसेच बूथप्रमुखांच्या वर मतदान केंद्राचा शक्तीप्रमुखही एकजण असेल. त्याचीही नियुक्ती करावी, अशा सूचना यावेळी इच्छुक उमेदवारांना देण्यात आल्या.
पिंपरी विधानसभा क्षेत्राची बैठक मोरवाडी येथील पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीला भोसरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते. चिंचवड विधानसभा क्षेत्राप्रमाणे याही बैठकीत सूचना देण्यात आल्या. या बैठकीला 100हून अधिकजण उपस्थित होते.