सिंहगडरस्ता – करोनामुळे प्रदूषणाच्या कारणास्तव गेल्या दिवाळीत फटाका विक्री तसेच उडविण्यावरही प्रतिबंद होते. त्यानुसार फटाका विक्री स्टॉलला परवानगीही देण्यात आलेली नव्हती. यावर्षी रुग्णसंख्या घटलेली असल्याने तसेच निर्बंध शिथिल झाल्याने महापालिका तसेच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परवाना घेऊन फटाका स्टॉलला परवानगी दिली जात आहे. परंतु, सिंहगड रस्ता परिसरात बहुतांशी स्टॉलधारकांकडे परवाना नसल्याने जे नियमांतर्गत व्यवसाय करीत आहेत त्यांच्यासह नागरिकांच्याही जीवाला अपघाताचा धोका अशा विनापरवाना स्टॉलमुळे निर्माण झाला आहे.
सिंहगडरस्ता परिसरात सध्या जागा दिसेल त्या ठिकाणी फटाका स्टॉल उभारण्यात आले आहेत. महानगरपालिकेने ठराविक ठिकाणीच अशा फटाके स्टॉलला परवाने दिले आहेत. परवाना देताना मोकळे मैदान आणि आरसीसी शॉप, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि वाहतूक पोलीस यांची परवानगी यासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यासह नियम व अटी-शर्ती लागू केलेल्या आहेत. परंतु, सिंहगड रस्ता परिसरात धायरी, नांदेड फाटा येथे सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामुळे अपघाताचा धोका असून विनापरवाना फटाका विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. कोणतीही परवानगी न घेता सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता फटाके स्टॉल सुरू आहेत. यातून दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होते आहे.
राजकीय सपोर्ट..?
या परिसरातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी राजकीय “सपोर्ट’ घेत फटका स्टॉल उभारले आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा पोलीस कारवाई करण्यासाठी गेले की, त्यांना राजकीय नावे सांगून आपण त्यांचे कार्यकर्ते आहोत, त्यांना जावून भेटा आणि मग कारवाई करा, असेही सूनावले जात आहे. त्यामुळे कारवाई करायची तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यावर, पदपथावर फटाका स्टॉल उभारण्यास अग्निशमन दलाकडून परवानगी दिलेली नाही. फटाके ज्वलनशील आणि धोकादायक असून त्याची विक्री करताना नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. बेकायदा स्टॉल असतील तर अतिक्रमण आणि पोलीस विभागाने त्यावर कारवाई केली पाहिजे.
– प्रशांत रणपिसे, अग्निशमन दल प्रमुख, सिंहगडरस्ता
धायरी, सिंहगड रस्ता, नांदेड परिसरात महापालिकेतर्फे फटाका विक्रीची परवानगी दिलेली नाही तरीही काही विक्रेत्यांनी पदपथावरच फटाका स्टॉल उभे केले आहेत, त्यांना नोटिसा बजावून कारवाई केली जात आहे. – संजीव ओहोळ, सहाय्यक आयुक्त,सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
धायरी, सिंहगड रस्ता, नांदेड फाटा या भागात बेकायदेशीर फटाका विक्री करणाऱ्या स्टॉल्सना पोलीस विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी. त्या विभागास पोलीस पूर्ण सहकार्य करतील.
– सदाशिव शेलार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक