पुणे : सप्टेंबर उजाडूनही प्रवेश प्रक्रियेची अनिश्‍चितता

"सीईटी''चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही

पुणे – अभियांत्रिकी, फार्मसीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या “सीईटी’चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दरवर्षी बारावीच्या निकालापूर्वीच होणारी एमएचटी-सीईटी यंदा निकाल लागून एक महिना उलटूनही अजून तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत. सप्टेंबर महिना उजाडला तरीही प्रवेशाची अनिश्‍चितता असल्याने शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी “सीईटी’ची प्रक्रिया राबविली जाते. अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी प्रथम वर्ष प्रवेशासाठी “एमएचटी-सीईटी’ घेतली जाते. तर अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही “सीईटी’ घेण्यात येते. यावर्षी “एमएचटी-सीईटी’साठी 8 जून ते 7 जुलै असा एक महिना नोंदणी करण्या साठी मुदत होती. यासह अन्य “सीईटी’साठी अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 12 ते 16 ऑगस्ट अशी विशेष बाब म्हणून संधी होती.

त्यानंतर चार-पाच दिवसांत “सीईटी’च्या तारखा जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत असल्याने पालकांतून नाराजी उमटत आहे.

शिक्षणमंत्र्यांची केवळ घोषणाच
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत एका कार्यक्रमासाठी आठवड्यापूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी सीईटी परीक्षांच्या तारखा दोन-तीन दिवसांत जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे लवकरच सीईटीचे वेळापत्रक प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानुसार अजूनही कार्यवाही होत नसल्याने पालकांतून प्रतिक्रिया उमटत आहे.

विद्यार्थी वैतागले
करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द झाली. त्यानंतर जवळपास सहा महिने विद्यार्थी सीईटीची तयारी करीत आहेत. मात्र अजूनही सीईटीबाबत काहीच स्पष्टता नाही. किती दिवस अभ्यासाची तयारी करायची, असा विद्यार्थ्यांचा प्रश्‍न आहे. याउलट जेईई मेन्सची परीक्षा झाली. मात्र राज्य शासनाची सीईटी वेळेत होत नसल्याने विद्यार्थी घरी बसून वैतागले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

महाविद्यालये वेळेत सुरू होण्याबाबत साशंकता
व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याचे शैक्षणिक वेळापत्रक अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार प्रथम वर्ष वगळता अन्य वर्षातील महाविद्यालये 1 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तर प्रथम वर्षाचे महाविद्यालय 15 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार राज्यातील अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांचे महाविद्यालये वेळेत सुरू होतील, याविषयी साशंकता आहे.

सोशल मीडियावरील वेळापत्रक बनावट
अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ आणि आर्किटेक्‍चर या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षेची तारीख व वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने हे वेळापत्रक बनावट असल्याचे सोमवारी सांगितले. परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जातील, असेही कक्षाने स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.