पुणे- पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दितील इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या नियमित तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात 7 ते 9 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन भरता येणार असून 13 सप्टेंबरला प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे विभागात अकरावी प्रवेशासाठी 315 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी झालेली असून यात 1 लाख 12 हजार 725 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. या जागांसाठी 84 हजार 452 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यातील 76 हजार 650 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक करण्यात आले आहेत. 76 हजार 225 अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली असून 68 हजार 882 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरलेले आहेत.
पहिल्या नियमित प्रवेश फेरील 30 हजार 816 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते तर दुसऱ्या फेरीत 15 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला झालेला आहे. आत्तापर्यंत एकूण 38 हजार 969 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. प्रवेश अर्जाच्या भाग एकची पडताळणी करून घेता येईल तर भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांना भाग दोनमध्ये बदल करता येणार आहे.
प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून अर्ज लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर होणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे.
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असून प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विशेष फेरीची प्रतीक्षा पहावी लागणार आहे. 16 सप्टेंबर रोजी अल्पसंख्याकचा कोटा प्रत्यार्पित करता येणार आहे. त्यानंतरच याच दिवशी प्रवेशाच्या राहिलेल्या रिक्त जागा दर्शविण्यात येणार आहेत.