‘एनआयए’ने घेतले डॉक्टरला ताब्यात
पुणे – शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात दहशतवाद्यांसंबंधीच्या हालचालींत वाढ झाल्याचे दिसत आहे. 18 जुलै रोजी कोथरूड पोलिसांनी महम्मद इम्रान खान व महम्मद युनूस साकी या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) व दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) आयसिसशी संबंध व दहशतवाद्यांना आश्रय(टेरर फंडिंग) दिल्याप्रकरणी दोघांना कोंढवा परिसरातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी प्रथम राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इस्लामिक स्टेटशी (आयसिस) संबंधित एका डॉक्टरला कोंढव्यातून अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत इस्लामिक स्टेटशी संबंधित माहिती हस्तगत करण्यात आली. ही माहिती इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या स्वरूपात होती. हा डॉक्टर इस्लामिक स्टेटच्या महाराष्ट्रातील मॉड्युलचाच एक भाग आहे. याप्रकरणी आजवर पाच जणांना एनआयएने अटक केली आहे.
डॉ. अदनानली सरकार (वय 43) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या घराच्या झडतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट, कागदपत्रे सापडली, त्याचा थेट संबंध इस्लामिक स्टेटशी असल्याचे उघड झाले. इस्लामिक स्टेटच्या हिंसक कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणारे साहित्य त्यामध्ये होते. जेणेकरून तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सामील होतील. आरोपींनी वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आयसिसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट रचला होता, असे एनआयएने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
डॉ. अदनानलीच्या माध्यमातून इस्लामिक स्टेट (खड), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (खडखङ), इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया (खडखड), दाईश, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (खडघझ) इसिस विलायत खोरासान, इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम खोरासान (खडखड-घ) अशा संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते. या माध्यमातून देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा प्रयत्न आरोपी करीत होते. या संघटनांच्या माध्यमातून आयसिस भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या तयारीत होते. एनआयएच्या तपासानुसार “महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल’ प्रकरणातील ही पाचवी अटक आहे.
यापूर्वी एनआयएने तीन जुलै 2023 रोजी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद ऊर्फ शेख अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली आहे.