पुणे : शहरात पावसाळयात तसेच इतर वेळी झाडपडीनंतर साचलेला कचरा उचलण्याची प्रक्रिया आता अधिक वेगाने होणार आहे. हा झाडांचा कचरा उचलण्यासाठीचे काम देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून पाच ग्रॅबर ट्रॅक्टर महापालिकेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे, एका वेळी आठ मजूरांचे काम हे ट्रॅक्टर अवघ्या पाच ते दहा मिनिटात करू शकणार आहेत. प्रत्येक झोनसाठी एक या प्रमाणे हे ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले असून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांच्या हस्ते त्याचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले आहे.
औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त संदीप खलाटे यांच्यासह युनिटी ग्रीन सोल्युशनचे समीर दुगाने, पोपट खैरे, सुनील पाटील, विशाल भुजबळ महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेकडून शहरातील उद्याने तसेच शहरात पडलेल्या झाडांचा कचरा उचलण्यासाठी युनिटी ग्रीन सोल्युशन्स या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.त्यासाठी या ठेकेदारांकडून 40 गाडया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शहरात ज्या भागात झाडपडी अथवा झाड कापल्यानंतर पडणारा कचरा या ठेकेदारांकडून उचलला जातो. त्यासाठी, त्यांच्याकडून कामगारांची नेमणूकही करण्यात आली आहे. मात्र, अनेकदा अवकाळी तसेच वादळी पावसाने मोठया प्रमाणात झाडे पडल्यास ती कापून ठेवली जातात मात्र, उचलण्यास पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अडचणी येतात. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले हे ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले असून जेसीबी प्रमाणे जवळपास पंधरा फूट उंची पर्यंत ते झाडांच्या फांद्या तसेच इतर कचरा उचलून थेट गाडीत टाकतात. त्यामुळे, आठ कामगार एका तासात करणारे काम हा ट्रॅक्टर द्वारे अवघ्या 5 ते 10 मिनिटात केले जात असल्याने झाडांच्या फाद्यांचा तसेच इतर लाकडाचा कचरा उचलण्याच्या कामास गती येणार आहे. या शिवाय, साठून पडलेल्या कचऱ्यात अनेकदा साप तसेच इतर किडयांसह, महावितरणच्या केबलचा धोका असतो. हा धोकाही या ट्रॅक्टर मुळे कमी होणार आहे.