पुणे – सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पुणेकरांची मोठी गर्दी होते. यापार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल केले आहेत.
मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. लष्कर भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्काॅन मंदिराकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टाॅवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटवरुन इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहेे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
फर्गसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- कोथरुड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.
महात्मा गांधी रस्ता, फर्गसन रस्ता वाहनांसाठी बंद
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात रविवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अराेरा टाॅवर्स चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्गसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्गसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.
शहरात कडक बंदोबस्त
पुणे शहरात नववर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने गर्दीच्या ठिकाणी व संवेदनशिल भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलीस दलाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. मॉल, लॉजेस, ढाबे, बस स्थानके आदी ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. धार्मिक स्थळांवरीही योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. सराईत गुन्हेगारांची देखील झाडाझडती घेतली जात आहे. घातपाताची घटना घडणार नाही तसेच चेंगरा चेंगरीची घटना होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.
पॉकेटमार आणि सोनसाखळी चोरांवरही लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार केली गेली आहेत. शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने नाकाबंदीचे आयोजन केले जाणार आहे. ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या कारवायाही प्रभावीपणे केल्या जातील. गर्दीच्या ठिकाणी शीघ्र कृती दल आणि दामिणी पथके तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्या सोबत बॉम्ब शोधक व नाशक पथकेही असणार आहेत. यासाठी पोलीस आणि वाहतूक शाखेचे तब्बल साडेतीन हजार अधिकारी व कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.