शेवगाव – तालुक्यातील श्री. क्षेत्र आव्हाणे बु.येथील निद्रिस्त गणपती देवस्थानात आज शनिवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभर भाविकांनी दर्शनबारी लावून श्री गणेशाचे भक्तीभावे दर्शन घेतले . यावेळी देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७ ला पैठणवरून कावडीने आणलेल्या गंगाजलाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीरावमुरलीधर भुसारी पाटील यांचे हस्ते श्रींना महाभिषेक घालून आरती करण्यात आली. दुपारी १२ वाजता भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. सायं ६ वाजता बालकीर्तनकार व गायनाचार्य श्वेता दीदी बढे सोमठाणे यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ७ ला पाथर्डीचे बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद कचरे यांच्याहस्ते श्रींची आरती व महाअभिषेक करण्यात आला .
रात्री साडेआठला भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आव्हाणे पंचक्रोशीतील भजनी मंडळ व दादोबा देव एकतारी भजनी मंडळीने जागर कार्यक्रम केला. दिवसभर दूरवरून आलेल्या भाविकांची दर्शनासाठी तर अनेकांची नवस फेडण्यासाठी झुंबड उडाली होती. देवस्थान टस्टचे अध्यक्ष प्रा.मालोजीराव भुसारी, सरचिटणीस अर्जुनराव सरपते, माजी विश्वस्त अंकुश कळमकर, सुधाकर चोथे, नारायण जाधव, कारभारी तळेकर, रामदास दिवटे, कार्यालयीन सचिव लक्ष्मण मुटकुळे , ज्ञानेश्वरचे संचालक बबनराव भुसारी, आव्हाणे सेवा संस्थेचे अध्यक्ष अंबादास कळमकर, संजय भुसारी यांनी सर्व कार्यक्रम यथासांग पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.