भारती हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश
पुणे – ब्रेन डेड झालेल्या ५७ वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानातून तीन जणांचे प्राण वाचले आणि दोघांना दृष्टी मिळणार आहे. एकीकडे देश प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असताना दुसरीकडे भारती हाॅस्पिटलमधील डाॅक्टर अवयवदानातून तीन जणांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नात होते. अखेर, त्यात त्यांना यश आले आहे.
भारती हाॅस्पिटलमध्ये ५७ वर्षीय रुग्ण मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ब्रेन डेड अवस्थेत होता, त्याच्या अवयवदानाने अनेकांचे प्राण वाचणार होते, हे अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या लक्षात आले आणि चक्रे फिरली. भारती हॉस्पिटल वैद्यकीय सामाजिक विभाग, केरळी चॅरिटेबल फाउंडेशन पुणे, आंतरराष्ट्रीय मानवता आयोगाची टीम यांनी अवयवदानासाठी कुटुंबीयाचे समुपदेशन केले. कुटुंबीकडून समंती मिळाल्यानंतर ही बाब हाॅस्पिटलच्या झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डीनेशन सेंटरच्या आरती गोखले यांना कळविण्यात आली, त्यांनी तत्परतेने अन्य रुग्णालयांशी समन्वय साधून अवयवदानाचे स्थान निश्चित केले.
एक किडनी भारती हॉस्पिटल येथील रुग्णास देण्यात आली. दुसरी किडनी अपोलो हॉस्पिटल, नाशिक येथे देण्यात आली. यकृत ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे देण्यात आले. तर, डोळ्यातील कॉर्निया भारती हॉस्पिटल आय बँकेत ठेवण्यात आला आहे. मृत्यूनंतरही अवयवांच्या रूपाने ती व्यक्ती जीवंत राहणार असून यथावकाश कॉर्निया वापरल्यावर त्या डोळ्यातून एखादा अंध जग पाहू शकणार आहे.
भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यासाठी आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी, उपसंचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांचे मार्गदर्शन मिळाले. भारती हॉस्पिटल अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर, भुलशास्त्र विभाग, युरो सर्जरी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजी आणि वैद्यकीय समाजसेवा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने तीन लोकांना जीवदान मिळाले.