– महापालिकेच्या पत्राशिवाय सर्वेक्षणास नकार
– सर्वेअरला सोसायटीत येण्यास मनाई
पुणे – राज्य मागासवर्ग आयोगातर्फे महापालिका कर्मचार्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मात्र, उपनगरांंमध्ये मोठ्या सोसायट्यांत सर्वेअरला प्रवेश नाकारला जात आहे. अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारातच एका विशिष्ठ समाजाचे लोक येथे राहतात, असे सांगत सर्वेअरला हुसकावून लावले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
महापालिकेने सर्वेक्षणासाठी २१०० कर्मचारी नेमले आहेत. त्यानुसार, शहरात सुमारे १२ लाख घरांचे सर्वेक्षण केले जाणार असून हे काम ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करायचे आहे. हे सर्वेक्षण सुट्टीच्या दिवशीही होत आहे. मात्र, शुक्रवारी २६ जानेवारी आल्याने तसेच त्यानंतर लगेच शनिवारी-रविवारी सुट्टी आल्याने पुणेकर सुट्टयांसाठी बाहेर गेल्याने सर्वेअरला अनेक घरे बंद असल्याचे आढळून येत आहे.
तर आता शहरात अनेक सोसायटयांमध्ये अडविले जात आहे. विशेष् म्हणजे हे सर्वेअर महापालिकेचे तसेच शासनाचे ओळखपत्र परिधान करून जात असले तरी त्यांना सोसायटीच्या प्रवेशद्वारावच थांबविले जात असून सोसायटी अध्यक्षाकडून सूचना मिळाल्यानंतरच आत सोडले जात आहे. परिणामी दिवसाला ८० ते १०० घरांचे सर्वेक्षण करायची जबाबदारी असलेले सर्वेअर केवळ ४० ते ६० घरांपर्यंतच पोहचत असून सर्वेक्षणाच्या कामावर परिणाम पडत आहे.
या येत आहेत अडचणी..
* सर्वेअरला सोसाय़टीत प्रवेशास नकार
* सलग सुट्टयामुळे घरे बंद
* काही सोसायटयात विशिष्ठ समाजाचा सर्वेक्षणास नकार
* आय फोन वर सर्वेक्षण होत नाही
* सोसायटयांकडून पालिकेच्या पत्रकाची मागणी
* सर्वेअरचीच केली जातेत २० ते २५ मिनिटे चौकशी