पुणे, दि. 16 -विधी महाविद्यालय रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून बालभारती ते पौड फाटा हा वेताळ टेकडीवरून रस्ता साकारण्यात येणार आहे. महापालिकेने त्यासाठी नेमलेल्या सल्लागारांकडून तीन प्रस्ताव सादर करण्यात आले असले तरी, या रस्त्यामुळे टेकडीवरील जैवविविधतेला धक्का लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या टेकडीची प्रत्यक्ष पाहणी करून नवीन रस्ता संमिश्र करता येईल का, असा नवा पर्याय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सूचवला आहे.
सल्लागारांकडून या रस्त्यांसाठी तयार करण्यात आलेले प्रस्ताव महापालिकेच्या अंदाज समितीत (एस्टीमेट कमिटी) सादर करण्यात आले होते. त्यावर चर्चा झाल्यानंतर महापालिका आयुक्त कुमार यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यानंतर आयुक्तांनी हा पर्याय सूचविला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्यासह पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांची भूमिका
महापालिका आयुक्तांनी सूचविलेल्या पर्यायानुसार पौडफाटा- केळेवाडी येथून “एआरआय’पर्यंत साधा रस्ता करावा, ज्या ठिकाणी जंगल तसेच झाडी सुरू होते, त्या ठिकाणापासून पुढे उन्नत (इलेव्हेटेड मार्ग) तयार करण्यात यावा, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. त्यानुसार आणखी एक आराखडा तयार करून त्याच्या खर्चाचा प्रस्ताव अंदाज समितीत ठेवला जाणार आहे. या प्रस्तावास मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे आहेत तीन पर्याय
पहिला पर्याय बालभारती ते पौड फाटा थेट जमिनीवरून रस्ता करावा, असा पर्याय आहे. मात्र, त्यात झाडे तोडावी लागणार असून नैसर्गिक नालेही अडणार आहेत. या कामासाठी 85 कोटींचा खर्च आहे.
दुसरा पर्याय संपूर्ण रस्ता उन्नत (इलेव्हेटेड) करण्याचा आहे. त्यामुळे टेकडीच्या पर्यावरणाला हानी होणार नसल्याचे सांगण्यात येत असून, या कामासाठी 171 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
तिसऱ्या पर्यायानुसार, टेकडीच्या खालून बोगदा तयार करून रस्ता तयार करणे. त्यासाठी सुमारे 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.