पुणे -कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून इच्छुकांची गर्दी पाहता, आता निवडणुकीचे वातावरण जोरदार तापायला सुरूवात झाली आहे. तर, राजकीय पक्षांची भूमिका पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास पूर्णपणे मावळत चालली आहे.
राज्यातील सत्ताबदल हा केंद्रबिंदू ठरला आहे. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये शहरात शिवसेनेला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे आता कसबा किंवा चिंचवड यापैकी एक जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, अशी मागणी पक्षाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे केली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात अहिर तसेच खासदार संजय राऊत बैठक घेणार असल्याची माहिती धनवडे यांनी दिली आहे. कॉंग्रेसने कसबा मतदार संघावर तर राष्ट्रवादीने चिंचवड मतदार संघावर दावा केल्याने ठाकरे गटही एका जागेसाठी आग्रही असल्याने वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसपाठोपाठ शिवसेनेने कसब्याची जागा मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आघाडीत एकमत होणार का? असा प्रश्न आहे.
भाजपच्या गोटात आनंद
महाविकास आघाडीत जागेसाठी सुरू असलेली रस्सीखेच पाहून भाजपने आनंद व्यक्त केला आहे. “कुणीही उमेदवार आला, तरी कसबा मतदारसंघात भाजपचा विजय नक्की आहे,’ असे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नमूद केले आहे.
यापूर्वी भाजपबरोबरच्या जागा वाटपात शिवसेनेला पुण्यात एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, आता शिंदे गटाच्या भूमिकेमुळे आणि पर्यायाने भाजपच्या विरोधातली नाराजी, उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती याचा फायदा महाविकास आघाडीने करून घ्यावा.
– विशाल धनवडे, माजी नगरसेवक, शिवसेना