काळवीटांच्या मृत्यू प्रकरणातून प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पुणे – कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे पाच काळवीटांचा मृत्यू घटनेनंतर येथील प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेसाठी प्रामुख्याने संग्रहालयाचे मुख्य व्यवस्थापक आणि तेथील सुरक्षा व्यवस्था हेच जबादार असून, महापालिकेने प्राणिसंग्रहालयाच्या प्रमुखांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातून केली जात आहे.
प्राणिसंग्रहालयात बुधवारी (दि.7) भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाच काळवीटांचा मृत्यू झाला आहे, तर दोन काळवीट जखमी आहेत. त्यांच्यावर संग्रहालयात उपचार केले जात आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यू झालेल्या काळवीटांपैकी एकाचा मृत्यू कुत्र्यांच्या चाव्यामुळे झाला आहे, तर चार काळवीटांचा मृत्यू हा भीतीमुळे ह्रदयावर ताण आल्याने (कार्डिऍक ऍटॅक) झाला आहे. यामध्ये दोन नर आणि दोन मादी काळवीटांचा समावेश आहे.
अचानकपणे खंदकात कुत्री आल्यामुळे काळवीट भेदरले होते. बचावासाठी सरभैर पळताना त्यापैकी काही सुरक्षा भितींला धडकले त्यामुळेच काही काळवीट जखमी झाले आहे, त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्राणिसंग्रहालयाच्या “क्वीक ऍक्शन टीम’ने तातडीने हालचाल करत काळवीटांना अधिक इजा पोहचणार याची काळजी घेतली असल्याचे संग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा सूर्यवंशी यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे या घटनेबाबत म्हणाले की, प्राणिसंग्रहालयात जाऊन कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना गंभीर आहे. याला व्यवस्थापक राजकुमार जाधव आणि याठिकाणी नियुक्त असलेली सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे. त्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे काळवीटांचा जीव गेला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जाधव हे ड्रेनेज विभागाच्या ठेकेदारांवर याचा दोष ठेवत आहेत. काळवीटांच्या शिकारी आडून ठेकेदारांची शिकार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जाधव यांच्यावर महापालिकेने कडक कारवाई करावी.
चौकशी समिती नेमणार : खेमणार
महापालिकेच्या कात्रज येथील भारतरत्न राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील काळवीट मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुमार खेमणार यांनी दिली. तसेच, संग्रहालयाच्या सुरक्षेचा फेर आढावा घेण्यात येणार असून सीमाभिंतीची तपासणी करण्यासह, काही ठराविक प्राण्यांच्या खंदकांची खोली वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर आपण स्वत: या संग्रहालयाची पाहणी केली आहे. त्यात, एका ठिकाणी नाल्याच्या बाजूने भटकी कुत्री आत आल्याची प्राथमिक शक्यता दिसून येते.