मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने सध्या जगाला धडकी भरली आहे, त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, भारतात देखील या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झालेले आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचं आढळून आले आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. हे तिन्ही प्रवासी रुग्ण पिंपरी-चिंचवडचे असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळं आता पिंपरी- चिंचवड भागात दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे राज्यात आणखी 3 प्रवाशी आढळले. तिनही प्रवाशी पिंपरी चिंचवडचे असून नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात आता एकूण 11 प्रवाशी झाले आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 7, 2021
‘ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे राज्यात आणखी 3 प्रवाशी आढळले. तिनही प्रवाशी पिंपरी चिंचवडचे असून नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात आता एकूण 11 प्रवाशी झाले आहेत’,असे ट्विट टोपे यांनी केले.
दरम्यान आतापर्यंत राज्यात ब्रिटनमधील कोरोना व्हायरच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेल्यांची रुग्णसंख्या 11वर पोहोचली असतानाच त्यातील 2 रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या स्ट्रेनच्या कोरोनाचा संसर्ग झालेले 11 रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. अर्थात या रुग्णंमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीत.