– पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार
पुणे – विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत आणि या भावी राष्ट्रनिर्मात्यांसाठी शिक्षण हे अधिक आनंददायी आणि कमी ताणतणावपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार परीक्षांचा उत्सव २९ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे प्रक्षेपण शाळांमध्ये दाखविण्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष तथा नोडल अधिकारी शरद गोसावी यांनी अधिकारी यांना जारी केले आहेत्.
पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.पंतप्रधानांचा संवाद थेट प्रक्षेपित केला जाईल. रेडिओ चॅनेल, वेबसाइटवर थेट वेब स्ट्रीमिंगद्वारे देखील उपलब्ध असेल. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील, जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये संगणक, टि.व्ही. तसेच मोठ्या स्क्रीन बसविण्याची व्यवस्था करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक यांना आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत.
बहुतांश शाळांमध्ये टीव्ही आणि लाईट जोडणीबाबत काही अडचणी असल्यास, त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे थेट भाषण पाहता, ऐकता येईल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनीही क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणांशी समन्वय साधून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थी थेट प्रक्षेपण पाहू/ऐकू शकतील याबाबत आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. कार्यक्रमानंतर कार्यक्रम पाहणाऱ्या मुलांची छायाचित्रे आणि तपशील पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहेत.
टि.व्ही.,रेडियो व मोठ्या स्क्रीनची सोय…
प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी किंवा निवडलेल्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना आकर्षित करणाऱ्या मोठ्या स्क्रीन बसवता आली तर अधिक लोकांपर्यत सदरचा कार्यक्रम प्रक्षेपित करता येऊ शकेल. अतिदुर्गम भागात जेथे टीव्ही पाहण्याची सुविधा शक्य नाही, अशा ठिकाणी रेडिओ, ट्रान्झिस्टरची व्यवस्था करण्यात यावी. समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध निधीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तथा इतर अनुदानित शाळांना टीव्ही भाड्याने घेणे आणि इतर व्यवस्थेसाठी करता येऊ शकणार आहे. सर्वांनी उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत संचालनालयास सादर होईल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.