पुणे – जुन्या बाजारातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून आता नव्याने उपाय योजना केल्या जाणार आहेत. त्या अंतर्गत, व्यावसायिकांना बसण्यासाठी रस्त्याकडेला जागा निश्चित केली जाणार आहे. मुख्य रस्त्यावर बॅरीकेंडींग केले जाणार आहे. तसेच, बॅरीकेंडीच्या बाजूला वाहने पार्क झाल्यास त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. या बॅरीकेंडींगमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन स्वतंत्र लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत.
या उपाय योजनांबाबत प्रत्यक्ष जागेची पाहणी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह, पथ विभागप्रमुख अनिरूद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळ व्यावसायिकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात आला.
यामुळे वाहतूक कोंडी…
शहराच्या मध्यवर्ती पेठांकडून पुढे कुंभारवाडयाच्या समोरून आरटीओ कार्यालय, ससून, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे स्टेशन, कॅम्प, पोलीस आयुक्त, तसेच या भागातील मोठया खासगी रूग्णालयांकडे जाणार्या रस्त्यावर जुना बाजार रविवारी आणि बुधवारी भरतो. यात ३०० पेक्षा अधिक व्यावसायिक रस्त्याची डावी बाजू पूर्णपणे व्यापतात. उजव्या बाजूला फर्निचर व अन्य साहित्याची दुकाने असल्याने व त्यांचे सामानही रस्त्यावर असल्याने दुहेरी वाहतूक असतानाही वाहतुकीसाठी फक्त एक मार्गिका उपलब्ध असते, त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते.
या करणार उपाय योजना…
– व्यावसायिकांना रस्त्याकडेची एक लेन देणार
– मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूस बॅरीकेडींग करणार
– मुख्य रस्त्यावरील तोडलेले दुभाजक बंद करणार
– रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दिवसभर कारवाई होणार
– व्यावसायिकांना जागा निश्चित करून देणार
“जुन्या बाजाराच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना निश्चित जागा आखून दिली जाईल. बॅरिकेडिंग केले जाईल. तोडलेले दुभाजक बंद केले जातील. याशिवाय झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नव्याने आखले जातील. रस्त्याच्या डाव्या बाजुला एक आणि उजव्या बाजुला एक अशा एकूण दोन मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध होतील.नियमबाह्य पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाईल.” – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा