चांदा – नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे चंपाषष्ठीनिमित्त जागृत देवस्थान खंडोबा यात्रो उत्सवानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महालक्ष्मी हिवरा येथे जुन्या काळातील नवसाला पावणारा खंडोबाचे मंदिर आहे. सहा महिने या गावात वांग्याचे कालवण (भाजी ) येथील गावातील कोणाच्या ही घरी बनवत नाही आणि खातही नाही. येथील खंडोबा देवाचे या गावामध्ये शास्त्र पूर्णपणे पाळले जातात.
यात्रा उत्सव निमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करतात. मोठा यात्रा उत्सव साजरा करतात. यात्रा उत्सवास मंगळवार बारा डिसेंबरपासून सुरुवात झाली. या दिवशी गंगेहून आणलेल्या कावडीने वाजत गाजत देवाला सायंकाळी स्नान घालण्यात आले.
बुधवार तेरा डिसेंबर रोजी रात्री छबिना तसेच हभप.मुक्ताई महाराज चाळक वेरुळकर यांचे कीर्तन झाले. गुरुवारी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ९ वा. होईल. शुक्रवारी संध्याकाळी चैताली पाटील यांचा आर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी महाराष्ट्रात गाजलेल्या गौतमी पाटील यांचा रात्री नऊ वाजता कार्यक्रम होईल.
यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी रात्री सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी सकाळी मंदिर परिसरामध्ये विविध कलावंताचा हजेऱ्या होतील. दुपारी चार वाजता जंगी हंगाम्याचे आयोजन करण्यात येईल व यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे.