पुणे -शहरात करोनाचे 5 पेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या इमारती आणि 20 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहेत. मागील सलग तीन आठवडे शहरात प्रत्येक आठवड्याला नव्याने 100 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली जात होती. मात्र, 17 ते 24 एप्रिल या आठवड्यात ही क्षेत्रसंख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. 16 एप्रिल रोजी शहरात एकूण 497 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र होती. त्यात कोणतीही वाढ झालेली नसून उलट 5 क्षेत्र कमी झाली आहेत. त्यामुळे ही संख्या दिलासादायक
ठरत आहे.
शहरात 80 टक्क्यांपेक्षा अधिक करोना रुग्ण सौम्य लक्षणे असलेले अथवा लक्षणे नसलेले होते. त्यामुळे ते घरीच विलगीकरणात राहात होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच असल्याने, तसेच विलगीकरणातील रुग्ण बाहेर पडत असल्याने त्यांच्याकडून करोनाचा प्रसार होत असल्याचे समोर आले.
त्यामुळे महापालिकेने गृह विलगीकरणातील रुग्णांवर बंधने घालण्यासाठी 5 पेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या इमारती आणि 20 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यास सुरूवात करण्यात आली. 16 एप्रिलअखेर सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्राची संख्या 497 होती. तर, त्यापूर्वी सलग तीन आठवडे ही क्षेत्रांची संख्या आठवड्याला 100 ने वाढत होती. मात्र, 17 एप्रिलपासून नवीन करोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून बाधितांचा आकडाही उतरणीला लागला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रातील रूग्ण बरे होत आहेत, तो भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येत आहे. परिणामी, शहरात आता 492 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आहेत.
औंध-बाणेरमध्ये वाढ
शहरात सर्वाधिक 78 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर भागात आहेत. सुरुवातीला तीन आठवडे या भागात सर्वाधिक क्षेत्र होती. त्यानंतर मागील दोन आठवडे सहकारनगर-धनकवडी परिसर आघाडीवर होता. तर आता धनकवडी-सहकार नगर तिसऱ्या क्रमांकावर असून या भागात 57 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर वारजे-कर्वेनगरचा परिसर असून या भागात 68 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तर सर्वांत कमी 8 प्रतिबंधित क्षेत्र कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असून उर्वरित 10 क्षेत्रीय कार्यालयांत 50 पेक्षा कमी प्रतिबंधित क्षेत्र आहेत.