पुणे – शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेली असताना महापालिका प्रशासनाकडे येरवडा येथे डांबर मिश्रीत खडी निर्मितीसाठी वारंवार बिघडणाऱ्या आणि जुनाट हॉट मिक्स प्लान्टवर अवलंबून राहावे लागते. हा एकमेव प्रकल्प गेल्या आठ वर्षांपासून पालिका वापरत असून त्याचे आयुर्मान संपल्याने तो महिन्यात 15 दिवस बंदच राहत असल्याने रस्ते दुरुस्ती रखडलेली आहे.
अशातच महापालिका आयुक्तांनी नवीन प्रकल्प उभारण्यासाठीच्या खर्चास मान्यता दिली असतानाच आता पालिकेच्या पथ विभागाकडे या प्रकल्पासाठी जागाच नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नव्या प्रकल्पांचा प्रस्ताव आयुक्तांकडे दोन वर्षे मान्यतेसाठी पडून असल्याचे पथ विभागाचे अधिकारीच खासगीत सांगत असत. मात्र, आता प्रत्यक्षात पथ विभागाने जागाच निश्चित केलेल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, कोंढवा, वारजे आणि शिंदेवाडी या तीन जागांची चाचपणी सुरू आहे. अद्याप जागाच निश्चित झालेली नसल्याने पावसाळ्यापूर्वी हा प्लान्ट उभा राहण्याची शक्यता दुरापास्तच आहे.
आपल्याच प्रकल्पाला मिळेना जागा
शहरात महापालिकेस विकास आराखडा तसेच ऍमेनिटी स्पेस अतंर्गत शेकडो जागा मिळालेल्या असून अनेक जागांवर अतिक्रमणे झालेली आहेत. तर अनेक जागा राडारोड्याच्या ढिगाऱ्याखाली आहेत. असे असताना महापालिकेच्या पथ विभागास एका हॉटमिक्स प्रकल्पासाठी जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेचा सध्याचा एकमेव हॉट मिक्स प्लान्ट येरवडा येथे आहे. रस्त्यासाठी आवश्यक डांबराची निर्मिती करणारा महापालिकेचा एकमेव प्लान्ट येरवडा येथे आहे.
प्रतिदिन एक हजार टन डांबर निर्मिती क्षमतेचा हा प्लान्ट 2015 मध्ये कार्यान्वित झाला. या प्लान्टची क्षमता केव्हाच संपुष्टात आली आहे. तसेच तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने हा प्लान्ट कालबाह्य झाला आहे. यातच हा प्लान्ट वारंवार बंद पडल्याने पालिकेची नव्या रस्त्यांची निर्मिती ठप्प झाली होती. येरवडा येथील जुना कमी क्षमतेचा प्लान्ट कार्यान्वित करून त्यातून तयार होणारे डांबर केवळ खड्डे बुजविण्यापुरते वापरले जात होते. तर नवीन प्रकल्पासाठी अवघा 4 कोटींचा खर्च असताना येरवडा येथील प्रकल्प सातत्याने खराब होत असल्याने महापालिका वर्षाला या प्रकल्पावर 40 ते 50 लाखांचा चुराडा करत असल्याचे चित्र आहे.