देहूगाव – देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण आणि उप नगराध्यक्ष शितल हगवणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी (दि. 24) निवडणूक झाली. यामध्ये नगराध्यक्षपदी पूजा दिवटे तर उपनगराध्यक्षपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवकपदी सचिन साळुंके आणि प्रदीप परंडवाल यांची निवड घोषित करण्यात आली.
देहू नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता पिठासन अधिकारी, हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा सुरू घेण्यात आली. यावेळी हवेलीच्या अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना निकम,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
पिठासन अधिकारी असवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होते. या जागेसाठी पूजा दिवटे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यांचे सूचक योगेश काळोखे व अनुमोदक प्रवीण काळोखे होते. एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर लगेचच उपनगराध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडली. या पदासाठी सुधीर काळोखे यांचा एकमेव अर्ज आला होता. या अर्जाचे सूचक योगेश काळोखे तर अनुमोदक प्रवीण काळोखे होते. एकमेव अर्ज असल्याने उपनगराध्यक्ष पदही बिनविरोध जाहीर करण्यात आले.
गटनेते योगेश परंडवाल यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रदीप मनोहर परंडवाल आणि सचिन संभाजी साळुंके यांचे नामनिर्देशन भरले होते. नामनिर्देशित सदस्य पदी दोघांचीही निवड करण्यात आली.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या 48 तास अगोदर नगरसेवकांना माहिती देणे बंधनकारक असते. मात्र प्रशासनाकडून वेळेत महिती न मिळाल्याचे कारण देत काही नगरसेवकांनी ही निवडणूक रद्द करावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक रद्द करण्याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. उलट निवडणूक प्रकिया वेळेवरच होणार असल्याचे संकेत देण्यात आले. दरम्यान या निवडणुकीसाठी काही नगरसेवकांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत दै. प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पडद्यामागे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सर्व नगरसेवकांना निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक यांचे नातेवाईक व समर्थक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने देहू नगरपंचयतीसमोर जमा झाले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणूक झाल्याचे जाहिर करताच समर्थकांकडून फटाक्याची आतिशबाजी आणि भंडाऱ्यांची उधळण करण्यात आली. त्यानंतर डीजेचे तालावर नाचत देहू परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.