नाथ साहेबांचं चांग भलंने गाव दुमदुमले : मध्यरात्री दोन वाजता वरात मंदिराबाहेर
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेच्या पाचव्या दिवशी ग्रामदैवतांची वरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशा, सनईच्या सुरात मध्यरात्री दोन वाजता दिपमाळ पेटताच, वरातीची लगबग सुरू झाली. यावेळी, गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत नाथ साहेबांचं चांग भलं अशा गजरामध्ये छबिनासह ग्रामदैवतांची वरात तब्बल 11 तासांनी संपली.
दरम्यान, उत्सवमूर्तींना नवीन वस्त्र परिधान करण्यात आले. देवाला सुगंधित आत्तर लावून, (नवरदेव-नवरीला) औक्षण करून, हळदीच्या दुधाचा नैवेद्य दाखवून, देवाला सोनं लावण्यात आले. दरम्यान, सुवासिनींनी देवीची ओटी भरून, तांबोळी परिवाराकडून मानाचा पानाचा विडा भरविण्यात आला. यानंतर उत्सव मूर्तींना पालखी ठेवण्यात आले. नाथ साहेबाचं चांगभलंच्या जयघोषात वरात मध्यरात्री 2 नंतर मंदिरांच्या बाहेर निघाली.
वाल्हे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा मागील पाच दिवसांपासून सुरू आहे. वराती दिवशी देव मध्यरात्री मंदिरातून बाहेर काढले जातात. यावेळी, देवाच्या काठी, पालख्या फुलांनी सजवून, विद्युत रोषणाई केली होती. ढोल, ताशा, सनईच्या तालावर, आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीत, गुलालाची मुक्त उधळण करीत, छबिना मुख्य बाजार पेठेतून, सर्व पालख्यांना आपापल्या ठिकाणी पोहोचवले जाते. यावेळी, समाज आरतीनंतर कुंभार समाजाच्या वतीने उपस्थित भाविकांना पान-सुपारीचे वाटप करून वरातीची सांगता करण्यात आली. यावेळी, मानकरी, सालकरी, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजआरतीने वरात पूर्ण
नाथांचे मुख्य ठाण असलेल्या कुंभारवाडा येथे देवाची वारात पोहोचली. यावेळी, कुंभारवाडा येथील देवघर येथे वरातीचे स्वागत फुलांच्या पायघड्या, तसेच आकर्षक रांगोळी रेखाटून करण्यात आले होते. दरम्यान, समाज आरती घेऊन देवाची वरात पूर्ण करण्यात आली.
वाल्हे (ता.पुरंदर) : ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या यात्रेनिमित्त देवाच्या वरातीत सहभागी भाविक गुलालाची मुक्त उधळण करीत, सनई, ढोल, ताशा वर नाचण्याचा ठेका धरला होते.