पुणे – शहरात हवा प्रदूषण करणाऱ्या घटकांच्या तपासणीसाठी महापालिकेने अखेर बारा दिवसांनी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 15 पथकांची नेमणूक केली आहे. ही पथके बांधकामे, राडारोडा, महापालिकेचे प्रकल्प, तसेच वायू प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांची पाहणी करणार आहेत. त्याचा दैनंदिन अहवाल सादर करणार आहेत.
या पथकात उपअभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचा एक सुरक्षा कर्मचारी असणार आहे. दरम्यान, हे पथक नेमण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार 9 नोव्हेंबर रोजी काढले होते. मात्र, प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे हे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना पोहचलेच नसल्याने ही पथके स्थापन झालेली नव्हती. दरम्यान, याबाबतचे वृत्त दैनिक “प्रभात’ने मंगळवारी दिल्यानंतर बुधवारी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा बैठक घेतली. त्यापूर्वीच क्षेत्रीय कार्यालयांकडून सकाळी या पथकांसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करत याची माहिती या बैठकीत सादर केले.
प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालय, पर्यावरण विभाग तसेच शिक्षण विभागावर सोपवली होती. त्यानुसार बांधकाम प्रकल्प, उड्डाणपूल, महापालिकेची विकासकामे तसेच राडारोडा आणि बांधकामाचे साहित्य वाहतूक करताना नियमांची अंमलबजावणी केली जाते की नाही याची तपासणी ही पथके करणार आहेत.
शहरातील बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी 25 फूट उंच पत्रे उभारणे, ज्युटची भिजविलेली जाळी लावणे, बांधकामाच्या परिसरात धूळ असल्यास सातत्याने पाणी मारणे अशा उपाय केल्या जात आहेत का, याची तपासणी बांधकाम विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार सहा बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच, महापालिकेच्या नोटीसच्या अनुषंगाने पूर्तता न केल्या संबधित बांधकाम थांबविण्याची कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी स्पष्ट केले.