पुणे – इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या वतीने ओला-उबेर-स्विगी-झोमॅटो कंपन्यांच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी लाक्षणिक बंद पुकारला. यामध्ये काही वगळता अन्य संघटनांनी सहभाग घेतल्यामुळे डिलिव्हरी सेवा बंद ठेवण्याची वेळ आली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
“मोबाइल ऍपद्वारे सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर यासह स्विगी आणि झोमॅटोवर सेवा देणारे सर्व कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत,’ अशी माहिती फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.
या बंदमुळे दिवसभरात पिझ्झा हट, केफसी यासह छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिकांनी ऑनलाइन सेवा बंद ठेवली. राज्य शासनाने महाराष्ट्रातही गीग वर्कर्स रजिस्ट्रेशन अँड वेल्फेअर ऍक्ट (गीग कामगार नोंदणी व कल्याणकारी कायदा) लागू करावा. याबाबत तत्काळ अधिवेशनामध्ये कायदा लागू करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन संघटनेने केले.