पुणे – सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या पीएचडी फेलोशिपसासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त चाळणी चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने जाहीर केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे १० जानेवारीला सारथी, बार्टी, महाज्योती यांच्या पीएच.डी. फेलोशिपच्या संयुक्त परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रावर घेण्यात आली. मात्र काही परीक्षा केंद्रावर सीलबंद असलेल्या प्रश्नपत्रिका न मिळाल्याने उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. इतकेच नव्हे, तर या परीक्षा केंद्रावर बहिष्काराचा निर्णय काही उमेदवारांनी घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठाने या परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनास स्थगिती देण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी जाहीर केले.
या परीक्षेसाठी ए.बी.सी व डी अशा चार प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती.या सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारु नये, असे नमूद करण्यात आलेले होते. ए आणि बी प्रश्नपत्रिका संचास सील होते, परंतु सी आणि डी प्रश्नपत्रिका संच वेगळ्या मुद्रणालयाकडून छपाई करुन घेतले असल्याने त्यांना सील नव्हते. सीलबंद प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे काही परीक्षार्थी हे परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांच्या बाबतीत परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
दरम्यान, परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांची प्रत कोणत्याही व्यक्तिकडे कोणत्याही स्वरुपात उपलब्ध नव्हती. तसेच त्या प्रश्नपत्रिकांमधील मजकूर देखील कोणत्याही व्यक्तिला कळालेला नव्हता. संपूर्ण परीक्षा प्रक्रियादेखील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे सदर परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक बाळासाहेब कापडणीस यांनी केला आहे.