पुणे – शहरातील ई-वाहनांसाठी महापालिकेकडून शहरात आजपासून २१ ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन सुरू केली जाणार आहेत. या ठिकाणी असलेला चार्जिंगचा दर महावितरणच्या चार्जिंगच्या दरापेक्षा ६ रूपयांची जास्त आहे. हे दर महावितरणशी सुसंगत ठेवावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. महापालिका शहरात ८२ ठिकाणी ही स्टेशन उभारणार असून त्यातील २१ स्टेशन शुक्रवार पासून पुणेकरंच्या सेवेत सुरू केली जाणार आहेत.
दरांमध्ये मोठी तफावत
मंचाने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार, महापालिका शहरात १९ रुपये प्रति युनिट दराने पैसे घेतले जाणार आहेत. मुळात कंत्राटदाराला या सर्व जागा महापालिका देणार असल्याने व चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी सर्व ठिकाणी सारखाच खर्च येणार असल्याने ग्राहकांना चार्जिंगसाठी द्याव्या लागणाऱ्या प्रती युनिट दरात १३ ते १९ रुपये एवढी तफावत का ? असा सवाल मंचाने उपस्थित केला आहे.
महावितरण कंपनीने स्वतः राज्यभरात ५० ठिकाणी ( पुणे शहरात ८ ठिकाणी) विजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणी केली आहे. तेथे १३.२५ रुपये प्रति युनिट या दराने चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे. मग, पुणे महापालिका १९ रूपये प्रति युनिट दर, का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, महापालिकेने कोणत्या ठिकाणी १३ रुपये व कोणत्या ठिकाणी १९ रूपये दर असणार आहे तसेच दरात तफावत हे जाहीर नागरिकांसाठी जाहीर करावे, अशी मागणीही मंचाचे अध्यक्ष वेलणकर यांनी केली आहे.