70 टक्के शाळा सुरू; केवळ 23 टक्केच उपस्थिती
पुणे – राज्य शासनाच्या आदेशानुसार सुमारे दहा महिन्यांनंतर प्राथमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी शहरात शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अजूनही अल्पच आहे. शहर हद्दीतील महापालिका व खासगी शिक्षणसंस्थांच्या इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग असलेल्या 70 टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांची उपस्थिती 23 टक्के इतकी असल्याची माहिती पालिका शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
पहिल्यांदा नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शहरात करोना नियंत्रणात येत असल्याचे दिसत असले तरी पालक मात्र अद्याप सावधगिरीच्या भूमिकेत आहेत. विशेषत: शहरात पालकांची ही जागरूकता अधिक दिसत आहे. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय काही पालकांनी पसंत केला आहे. शहरातील पहिली ते आठवीपर्यंत शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार आता शाळा सुरू होत आहे.
शालेय वाहतुकीचा फटका
शहरातील मुख्यवर्ती भागात असलेल्या बहुतांश शाळांमध्ये उपनगरात राहत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास काही पालक उत्सुक असले तरी अद्याप खासगी शालेय वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडणे आणि परत आणणे हे शक्य नसल्याने नाइलाजाने त्यांनी विद्यार्थ्यांना घरीचे ठेवले आहे. परिणामी, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.
बससेवा तातडीने सुरू करा…
शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या बसची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी पीएमपीकडून शालेय बसची व्यवस्था केली जाते. यंदा मात्र करोनानंतर दीर्घ कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्याप शालेय बस सुरू झालेल्या नाहीत. शहरातील जवळपास पालिकेच्या 18 विद्यानिकेतन शाळा आहेत. प्रत्येक शाळेला सुमारे दोन पीएमपीच्या बस लागतात. विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने सर्व शाळांकडून प्रस्ताव मागविले आहेत. सर्व प्रस्ताव एकत्रितपणे पीएमपीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर शालेय बस सुरू होतील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.