पुणे- पुणे शहराचे वैभव, पुण्याशी भारताला जोडणारे आणि दररोज हजारो जणांची ने-आण करणारे स्थानक अशी पुणे स्टेशनची ओळख. प्लॅटफॉर्म 1 बाहेर दिसणारा घुमट फक्त इमारत नाही, तर आपल्या शहराचा आणि पर्यायाने देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. या पुणे स्टेशनच्या इमारतीने बुधवारी दि. 27 जुलै 2022 रोजी 98 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त…
मुंबईवर ब्रिटिशांनी जितकं प्रेम केलं, तितकंच पुण्यावरही. सध्या आपल्याला पुणे स्टेशनची जी इमारत दिसते, ती ब्रिटीश सरकारच्या स्थापत्य शैलीची रचना म्हणता येईल. देशातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली. त्याच्या पाच ते सहा वर्षांतच पुण्यात रेल्वे सुरू झाली. त्यावेळी पुणे हे लष्कराचे प्रमुख ठाणे होते. त्यामुळेच ब्रिटिशांनी पुण्याकडे विशेष लक्ष दिले. त्यातूनच रेल्वे स्थानकाची विशेष रचनेची देखणी इमारत उभी केली. तिच्या लौकिकाला शोभेल, असे भव्य उद्घाटन केले, तो दिवस होता 27 जुलै 1925. म्हणजेच बरोबर 97 वर्षांपूर्वी.
मानवी आयुष्याशी तुलना केली, तर 97 वर्षांचा अखंड, अथक आणि अविश्रांत प्रवास ही खूप मोठी उपलब्धी असते. अशा वेळी शंभरीकडे झुकल्याच्या खुणा चेहरा-शरीरावर दिसतात. पण, पुणे स्टेशनची इमारत याला पुरेपूर अपवाद ठरली आहे. वयाचे शतक गाठत असतानाही ही वास्तू पुणेकरांसह रोजच्या हजारो प्रवाशांशी नाळ जोडून आहे. पुण्याच्या सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि चौफेर विकासाची साक्ष देत ही वास्तू अजूनही ठाम उभी आहे आणि पुढील 2 वर्षांनी ती “सेन्च्युरी’ गाठणार आहे. विशेष म्हणजे, “पाकिस्तानातील’ लाहोर आणि पुणे स्टेशन या दोन्हींची इमारत अगदी जुळी!
तीन वर्षांत बांधकाम, पावणेसहा लाख खर्च
पुणे स्थानकाच्या इमारतीचा पहिला आराखडा पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली 1915 मध्ये तयार झाला. मुख्य अभियंता जेम्स बर्कक्ले यांच्या नियोजनाखाली 1922 मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू होऊन फक्त
3 वर्षांत ते पूर्णही झाले. 4472.38 चौरस मीटर क्षेत्रावरील या भव्य इमारतीसाठी 5 लाख 79 हजार 665 रुपये खर्च आला होता.
तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत या वास्तूचे ब्रिटीश परंपरेला साजेसे भव्य उद्घाटन झाले. या समारंभासाठी मुंबईहून विशेष ट्रेन पुण्यापर्यंत आल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. या इमारतीचे आर्किटेक्चर स्थापत्य अभियंत्यांना भुरळ घालते आणि आजच्या तांत्रिक युगात अशी इमारत उभारणं केवळ अशक्य!
मॉडेल अन् हेरिटेज
या इमारतीला मॉडेल रेल्वे स्थानक म्हणूनही मान्यता मिळालेली आहे. इमारतीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जाही मिळालेला आहे. इमारतीच्या उद्घाटनानंतर 1929 मध्ये पुणे स्थानकावरून विजेवरील रेल्वे धावली. 1930 मध्ये पुणेकरांची लाडकी “डेक्कन क्वीन’ सुरू झाली. आशियातील पहिली दुमजली ट्रेन “सिंहगड एक्स्प्रेस’ही येथूनच धावली आणि आता ही इमारत “वंदे भारत’ आणि “बुलेट ट्रेन’साठीही सज्ज आहे.