पुणे – स्थिर सरकारमुळे बांधकाम क्षेत्राला फायदा : शांतीलाल कटारिया

पुणे – घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या दृष्टीने मोदी सरकारने गेल्या तीन ते चार वर्षांत अत्यंत प्रभावी निर्णय घेतले, याचा फायदा अनेक मध्यमवर्गीयांना होत आहे. स्थिर सरकार राहिल्याने बांधकाम क्षेत्रालाही त्याचा फायदा होईल, असे मत राष्ट्रीय क्रेडाई उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्‍त केले.

बांधकाम क्षेत्रात ग्राहकांचे व विकसकांचे अनेक निर्णय हे बाजारातले स्थैर्य या गोष्टींवर अवलंबून आहे. बांधकाम क्षेत्रात सध्या आशेचे वातावरण असून बऱ्याच प्रतीक्षेनंतर गुंतवणूक दारांसाठीही आता चांगले दिवस आले आहेत. पायाभूत सुविधांवर सध्याचा सरकारचा भर असल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या विविध विकास प्रकल्पांचाही फायदा बांधकाम क्षेत्राला होईल. नवीन सरकारकडून बांधकाम क्षेत्राला असणाऱ्या अपेक्षांबाबत प्रधानमंत्री कार्यालयाकडे निवेदन दिले आहे. त्यावर सकारात्मक निर्णय होतील, अशी अपेक्षा असल्याचे कटारिया यांनी सांगितले.

राज्य क्रेडाईचे अध्यक्ष राजीव परीख म्हणाले, बांधकाम उद्योगात सुलभता येण्यासाठी पर्यावरण, शहर नियोजन, एनए परवानगी यात बदल करणे अपेक्षित आहे. जलद आणि ऑनलाइन प्रकल्प मंजुरी, कर संरचना सुधारणा यावर आगामी सरकारने भर द्यावा. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे येत्या काळात आवश्‍यक आहे. पायाभूत सुविधा बरोबरच शहर सुधारणेसाठी रस्ते, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, मुबलक पाणीपुरवठा करण्यावर भर द्यायला हवा. वेगवान विकासासाठी व बांधकाम व्यवसायाच्या प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचाही अवलंब आगामी सरकारने करावा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×