ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांची राजीनाम्याची घोषणा

लंडन: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. येत्या 7 जून रोजी आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असून त्यानंतर पक्षाला आपल्या जागी दुसरा पंतप्रधान नेमता येईल असे त्यांनी म्हटले आहे. युरोपियन समुदायातून ब्रिटनने बाहेर पडावे या मागणीसाठी आग्रही असलेल्या थेरेसा मे या सन 2016 साली याच मुद्‌द्‌यावर देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या. पण त्यांना ही मागणी पुर्ण करण्यात अपयश आल्यामुळे त्यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याची घोषणा साश्रुनयनांनी केली.

आज आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. त्या म्हणाल्या की, ब्रेक्‍झिट प्रस्ताव संमत व्हावा यासाठी मी कसोशिचे प्रयत्न केले. पण त्यात मला अपेक्षित यश आले नाही. मी तडजोड करून या पदावर राहु इच्छित नाही. तडतोड हा माझ्यासाठी अत्यंत घाणेरडा शब्द आहे. पक्षाच्या खासदारांनी या प्रस्तावासाठी राजी व्हावे यासाठी जे करणे शक्‍य होते ते मी केले.

मला हे काम करता आले नाही याचा मला मनस्वी खेद होत असून त्यासाठीच मी राजीनाम्याची घोषणा करीत आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपण या देशाच्या केवळ दुसऱ्या महिला पंतप्रधान होतो. आपल्यानंतरही अधिक महिलांना देशाच्या या सर्वोच्च स्थानावर विराजमान होण्याची संधी मिळावी असे नमूद केल्यानंतर त्यांचा गळा दाटून आला. आपण या पदावरून जात असलो तरी आपल्या मनात आता कोणताही रोष नाही. या देशाची सेवा करण्याची अभुतपुर्व संधी मला जनतेने दिली त्याबद्दल मी कृतज्ञतच राहील असे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.