सातारा वगळता पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस आघाडी खिळखिळी!

मातब्बरांच्या पराभवाने सद्दी संपल्याची चर्चा, विधानसभा निवडणुकीसाठीही धोक्‍याची घंटा

सातारा – पश्‍चिम महाराष्ट्रात साताऱ्याचा अपवाद वगळता कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व पुरते खिळखिळे झाले. कोल्हापूर, सांगली, माढा, सोलापूर येथे भाजप सेना युतीने कॉंग्रेस आघाडीला एकहाती धोबीपछाड दिला. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या विजयाने पवारांची राजकीय सद्दी संपवल्याची चर्चा आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे राजकीय वजन वाढल्याचे पाहायला मिळाले.

लोकशाहीत मतदार ही आपली पारंपरिक गढी आहे हा गैरसमज या निकालांनी पुरता खोडून काढला आहे. भाजप सेना युती पश्‍चिम महाराष्ट्रात स्थिरावत असल्याने विधानसभा निवडणुका या राष्ट्रवादीसाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहेत. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव, वसंतदादांच्या सांगलीत कॉंग्रेसचा पराभव, मावळमध्ये मतदारांनी पार्थ पवार यांना नाकारून घराणेशाहीला दिलेली चपराक, कोल्हापुरात कॉंग्रेसच्या बंडाने झालेले राष्ट्रवादीचे पानिपत, या घटनांनी आघाडीची पाळेमुळे हादरवली.

साताऱ्यात उदयनराजे निवडून आले तरी इथे व्यक्तीकेंद्रित राजकारण चालते हे विसरून चालणार नाही. आणि भाजपची बांधणी होत असली तरी शिवसेना मात्र विस्कळीत होती म्हणून नरेंद्र पाटील यांच्या मिशीला पुरेसा राजकीय पीळ मिळाला नाही. कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, सोलापूर येयील सहकारी दूध संस्था, बॅंका, सूतगिरण्या यावर आघाडीचा गेल्या चार दशकाचा असलेला प्रभाव युतीने राजकीय डाव टाकत ओसरवला. युतीने नियोजनबद्ध प्रयत्न करीत आपली ताकद वाढवण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत दिसून आला.

माढ्यात पवारांना धक्का
ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शरद पवारांनी केले त्या माढा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाने पक्की मांड ठोकली. कॉंग्रेसची मदत, मोहिते पाटील गटाची ताकद, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली व्यूहरचना, दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी या मतदारसंघात केलेला प्रचार या जोरावर भाजपने माढ्यात कमळ फुलवले. शरद पवारांचे माघारीनाट्य व तिकिट नाकारले गेल्याने भाजपवासी झालेला मोहिते गट या घडामोडी राष्ट्रवादीला भलत्याच महाग पडल्या.

साताऱ्यात हवा कॉलरचीच
साताऱ्यात पक्ष नाही फक्‍त उदयनराजे चालतात हे या निकालांनी सिद्ध केले. मात्र, सातारा शहरात उदयनराजेंना झालेले अवघे बत्तीस हजार मतदान यामुळे आता फक्त कॉलर उडवून चालणार नाही हे राजेच्या लक्षात आले असावे. राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी असली तरी पवारांनी उदयनराजेंवर दाखवलेला विश्‍वास सातारकरांनी सिद्ध केला. आजही पवारांच्या धोरणांवर साताऱ्याचा विश्‍वास आहे हे समोर आले.

शिंदेंच्या जिव्हारी लागलेला पराभव
सोलापुरात दुरावलेला लिंगायत समाज व वंचित आघाडीने हिसकावलेली कॉंग्रेसची मते यामुळे कॉंग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव भलताच जिव्हारी लागला. लिंगायत समाजाची मते खेचण्यासाठी भाजपने केलेली जयसिद्धेश्‍वर स्वामींना तिकिट देण्याची राजकीय खेळी यशस्वी ठरली आणि शिंदेंचा तिथेच पराभव निश्‍चित झाला. वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेसच्या हक्काची दलित व
मुस्लिम कोटयाची मते पळवली त्याचाच मोठा फटका कॉंग्रेसला
बसला.

कोल्हापुरात आमचं ठरलंय
आमदार सतेज पाटलांनी “आमचं ठरलयं’ म्हणत जी हवा तापवली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील येथे चतुरस्त्र खेळी केली. महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडण्यात आला. धनंजय महाडिक यांच्या विरोधातील सुप्त विरोधाला शिवाजी पेठेतून हवा देण्यात चंद्रकांत दादा यशस्वी झाले. गोकुळच्या निमित्ताने काका महादेवराव महाडिक यांचा राजकीय अहम कोल्हापूरने पाहिला. सतेज पाटलांचे सुप्त भाजप संधान आणि धनंजय महाडिक यांचा अतिआत्मविश्‍वास या त्रुटी सेनेच्या संजय मंडलिक यांना खासदारकीचे बक्षिस देऊन गेल्या.

राजू शेट्टी पुन्हा बांधावर
खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघात मतदारराजाने अस्मान दाखवले. शेट्टीचा भांडवलशाही कारखानदार लॉबीतील प्रवेश शेतकऱ्यांना अजिबात पटला नाही. केवळ कारखानदारीला विरोध आणि विकासाची बोंब या विरोधाभासाला थेटपणे नाकारण्यात आले. वारणेच्या पाणी प्रश्‍नावर राजू शेट्टी यांनी मौन बाळगले. इचलकरंजीसारख्या शहरावर असलेल्या मंदीच्या सावटावर शेट्टींना उत्तर देता आले नाही. या नाराजीचा फायदा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी उठवत विजयश्री खेचून आणली.

सांगलीत कॉंग्रेस गलितगात्र
कॉंग्रेसच्या अंतर्गत भांडणाने वसंतदादा पाटलांच्या सांगलीत स्वतःचे अस्तित्व संपवले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीतली दुफळीचा फटका वसंतदादा यांचे नातू विशाल पाटील यांना बसला. वंचितच्या गोपीनाथ पडळकर यांच्या मतविभागणीचा मोठा फटका पाटील यांना बसला. गटातटाचे भांडण असूनही संजय काका पाटील यांच्यासाठी भाजपचे सर्व बळ निर्णायक टप्प्यात पणाला लागले. विश्‍वजित कदम यांनी केलेले दुर्लक्ष कॉंग्रेसला भोवल्याची चर्चा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here