पुणे –सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून प्रस्तावित आहे. ट्रायल रन आणि बैठकानंतर अजूनही ई-बसेससाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गडावर खासगी वाहनांना बंदी करत, पायथ्यापासून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी ही ई-बस सेवा उपलब्ध करणे नियोजित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांसह पीएमपी, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ई-बसने सिंहगडाचा दौरा केला होता. मात्र, त्यानंतर ही सेवा मात्र चर्चेमध्येच अडकल्याचे चित्र आहे. यासंदर्भात नवीन वर्षात ही सेवा सुरू होण्याचे संकेत देखील पीएमपीने दिले होते. परंतु, हा मुहूर्त देखील हुकला आहे.
गोळेवाडी ते सिंहगड किल्ला या मार्गावर सेवा देण्यात येणार आहे. यासाठी ई-बसेस सोडण्याचे नियोजन आहे. तर गडाच्या पायथ्याला पार्किंग जागा आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. तर या बसेसच्या संचलनातून येणारे उत्पन्न देखील वनविभागाला देण्यात येणार आहे. या बससेवेमुळे गडावर जाण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र सेवा नेमकी केव्हा सुरू होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
सिंहगडाच्या बससेवेबाबत वनविभागाशी करार होणे बाकी आहे. यासह संचलनासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने देखील प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी