दोघा शॉर्प शूटरची नावे निष्पन्न; पंजाब पोलीस मागावर
एका आरोपीच्या घराची घेतली झाडाझडती
पुणे – देशभर खळबळ उडवून दिलेल्या पंजाबमधील गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन निष्पन्न झाले आहे. या हत्येमध्ये दिल्लीच्या लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आंबेगाव परिसरातील गुंड संतोष जाधव, सौरभ महाकाळ सामील असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान पंजाब पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पंजाबमधील पोलिसांच्या पथकाने जाधव याच्या घराची रविवारी (दि.5) झाडाझडती घेतली. मात्र, तो व त्याचा साथीदार सौरभ महांकाळ फरार झाले आहेत.
जाधव व महांकाळ यांच्या शोधासाठी पंजाब पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम जारी केली आहे. देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी सर्व एसटी, रेल्वे स्थानकांवर तसेच विमानतळांवर या दोघांच्या छायाचित्रासंह माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात 29 मे रोजी मुसेवाला याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे देशभर मोठी खळबळ उडाली. या घटनेची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेऊन युद्धपातळीवर या प्रकरणाचा शोध घेण्याच्या सूचना पंजाब पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार, एका स्वतंत्र पथकाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
प्राथमिक तपासामध्ये दिल्लीतील गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने सहकाऱ्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुसेवाला याची हत्या घडवून आणली असल्याचे निष्पन्न झाले. तिहार कारागृहात बंदी असलेल्या बिष्णोई याची कसून चौकशी केल्यावर त्याने या हत्येची कबुली दिली. तसेच, या कटामध्ये पंजाबमधील तीन, राजस्थानमधील तीन व पुण्यातील दोघेजण सामील असल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार तेथील पोलिसांनी तत्काळ रविवारी पुण्यात येऊन जाधव व महांकाळ यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोघेही त्यांच्या हाती लागू शकले नाहीत.
संतोष जाधववर अनेक गुन्हे दाखल
संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचर येथे त्याची सासुरवाडी आहे. तो पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या दप्तरी नोंद असलेला गुन्हेगार आहे. पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले (वय 24, रा. पांढरीमळा, मंचर) याचा 1 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एकलहरे गावाजवळ पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. या गुन्ह्यात संतोष जाधव याचे नाव निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध लुटमारीचाही गुन्हा दाखल आहे. ग्रामीण पोलिसांनी खून प्रकरणामध्ये त्याच्याविरुद्ध मोक्काअन्वये कारवाई केली. तेव्हापासून तो फरारी आहे. तो हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान भागात गेला असून तेथे त्याने गुन्हेगारी टोळी तयार केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. राजस्थानमधील अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसही त्याच्या मागावर होते.
दरम्यान, जाधव याचा साथीदार महांकाळ हा ही त्याच्यासोबत अनेक गुन्ह्यात सामील असल्याची पोलिसांची माहिती आहे. मात्र, अद्याप त्याच्याविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली. पंजाबमधील संवेदनशील गुन्ह्यामध्ये या दोघांचा सहभाग उघड झाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.