वारजे – नदीपात्रातील शिवणे-खराडी रस्ता भूसंपादनाअभावी अद्यापही रखडलेलाच आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून पुन्हा तयार करण्यात आला असून तो महापालिका आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यान भूसंपादनात तांत्रिक अडथळे असल्याने काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे भुसंपादन कधी होणार? आणि शिवणे-खराडी रस्ता होणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत नदीपात्रातून शिवणे-खराडी रस्त्याचे काम 2011 मध्ये सुरू झाले. एकूण 18 कि.मी.चा हा रस्ता आहे. यासाठी 307 कोटी 44 लाख रुपयांचे पूर्वगणनपत्र तयार करून महापालिकेच्या पथ विभागाकडून निविदा काढून ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली. परंतु, भूसंपादनामुळे कामात अडथळले आले. मे 2014 मध्ये कामाला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर 2016 मध्येही हे काम झाले नाही त्यामुळे मे 2018 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. कर्वेनगरमध्ये महालक्ष्मी लॉन्सपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. तर राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यान भूसंपादनाअभावी काम अपूर्णावस्थेत आहे, त्यामुळे सध्या जेवढा रस्ता पूर्ण झाला आहे, तो सुरू करण्यात आला आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. येथील भुसंपादनाचा विषय सुटल्यावर रस्त्याचे काम सुरू होईल, असे महापालिकेच्या पथविभागाकडून सांगण्यात आले.
महालक्ष्मी लॉन्स येथील काही जागा ताब्यात आली असून, तेथील रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यान जवळ 35 गुंठे जागेचे भुसंपादन बाकी आहे. याबाबत मी स्वत: जागामालक आणि आयुक्तांची बैठक लावून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. काही ठिकाणी कच्चा रस्ता असून आयुक्तांच्या बैठकीनंतर जागा ताब्यात आल्यावर रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.
– राजेश बराटे, माजी नगरसेवक