पुणे – शरद मोहोळच्या खूनामागे काही राजकीय कारण असू शकते का, त्या दुष्टीनेही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मागील काही दिवसांत मोहोळने आपली राजकीय प्रतीमा हिदू नेता म्हणून बनवण्यास सुरुवात केली होती. तसेच त्याच्या पत्नीनेही सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता. आगामी निवडणुकांना त्याला किंवा त्याच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मोहोळ खून प्रकरणात आणखी कितीजण सामील आहेत, तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे.
कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी (५ जानेवारी) मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला.
जमिनीच्या वादातून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान यांना अटक करण्यात आली आहे. कोथरुड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबेे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी दिले.
प्राथमिक तपासात मोहोळचा खून आर्थिक, तसेच जमीन व्यवहारातील वादातून झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्य सूत्रधार आरोपी पोळेकर याचा नामदेव कानगुडे याचा मामा आहे. नामदेवचा मोहोळने अपमान केला होता. अपमानाचा बदला घेण्यासाठी पोळेकरने खून केला. पोळेकरला पिस्तूल खरेदीसाठी आर्थिक मदत कोणी केली, तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.