पुणे – सारसबाग चौपाटीवरील खाद्यपदार्थ्यांच्या व्यवसायिकांनी नियम व अटीच्या संदर्भात हमीपत्र दिल्याशिवाय स्टॉल सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिका अधिकाऱ्याने स्पष्ट केले असता व्यवसायिकांना स्टॉल उघडण्यास परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणातही तोडगा निघाला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले.
सारसबाग चौपाटी येथे 53 स्टॉल आहेत. या ठिकाणी पाळणे व घोडेवालेही आहेत. येथे रात्री उशीरापर्यंत शहरातील नागरिकांसह परगावाहून आलेल्या पर्यटकांची वर्दळ असते. या चौपाटीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वारंवार कारवाई होते. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा ह चौपाटी दुमदमते. या पार्श्वभूमीवर दहा दिवसांपूर्वी महापालिकेने येथील 53 स्टॉल सील केले आहेत. हे स्टॉल पुन्हा सुरू करण्यासाठी व्यवसायिकांकडून प्रयत्न केले जात आहेत.
मात्र, येथील व्यवसायिकांनी स्टॉलच्या बाहेर टेबल व खुर्टी ठेवणार नाही, स्टॉलच्या वरील बाजूचा अनधिकृतपणे वापर करणार नाही, रात्रीच्या वेळी स्टॉलमध्ये कामगार राहणार नाहीत, प्रशासनाच्या परस्पर भाडेकरू ठेवणार नाही, भाडे थकवणार नाही, असे हमी पत्र दिल्याशिवाय स्टॉल उघडण्यास परवानगी मिळणार नाही, यावर महापालिका प्रशासन ठाम आहे.
स्टॉल उघडण्यास परवानगी द्या…
महापालिकेच्या कॉफीटेबल बुकमध्ये सारसबाग चौपाटीचे नाव प्राईड ऑफ पुणे म्हणून समाविष्ट असताना महापालिकेनेच चौपाटीवरील दुकाने सिल केली आहेत. चौपाटी ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्यावर रहदारी नाही. मोठ्या वाहनांची ये-जा नाही. त्यामुळे प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची आहे. महापालिकेने या ठिकाणी चौपाटी विकसित करावी आणि व्यवसायिकांना ठरवून जागा द्यावी, तत्पूर्वी स्टॉल सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन महापालिका आयुक्ता विक्रम कुमार यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेविका अश्विनी कदम यांनी दिले आहे.