पुणे –हापूस आंबे विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याजवळील सर्व आंबे अतिक्रमण विभागातील कर्मचारी घेऊन गेले. त्यानंतर संबंधित विक्रेत्याने दंडाची पावती भरून अधिकाऱ्यांनी जप्त केलेले आंबे पुन्हा घेण्यासाठी गेल्यावर त्या विक्रेत्याला 40 ते 42 डझन जप्त केलेल्या आंब्यांपैकी केवळ पाच ते सहा डझन आंबे दिल्याने विक्रेता शफिक शेख याने पुणे महापालिका आणि चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यामुळे आंबे खाणारे अधिकारी कोण? अशी चर्चा रंगली आहे.
वाहतुकीस अडथळा होवू नये, अपघात होऊ नये या दृष्टीने रस्त्यावर अतिक्रमण करून फळे विकण्यासाठी बसणाऱ्या व्यापाऱ्यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. त्यानुसार पुणे महापालिकेच्या अतिक्रम विभागाने 16 मे रोजी सूस रोडवरील बालाजी चौकात छोटा हत्ती टेम्पो उभा करून त्यामध्ये हापूस आंब्याची पेटी विक्री करणाऱ्यावर कारवाई करीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 20 ते 25 हजार रूपये किमतीचे जवळपास 42 डजन हापूस आंबे जप्त केले. आंबे परत घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात गेले. हापुस आंबे हे नाशवंत खाद्यपदार्थ असून देखील पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शफीक शेख यास पाच-सहा दिवस वेगवेगळ्या कार्यालयात फिरवल. त्यानंतर शफिकला पाच हजार रुपयांची पावती भरण्यास सांगून त्याला फक्त सात डझन सडके आंबे परत करण्याचा प्रकार घडला.
सडलेले आंबे परत घेण्यास नकार देत, हापूस आंबे खाणाऱ्या महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शफीक शेख यांनी पुणे महानगरपालिका तसेच चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर त्यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवार पुढील कारवाई करण्यात येईल.
– माधव जगताप, अतिक्रण विभाग प्रमुख, पुणे महानगरपालिका