पुणे – शिवाजीनगर भागातील संचेती चौकात असलेल्या भुयारी मार्गात पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. भुयारी मार्गातील वाहतूक दररोज रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
शिवाजीनगर येथील वेधशाळा चौक ते न्यायालय दरम्यान मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. संचेती चौकात भुयारी मार्गातील पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत भुयारी मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत भुयारी मार्गातील वाहतूक रात्री बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
पर्यायी मार्ग
संचेती चौकातील भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी संचेती चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातून संगम पुलामार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालयमार्गे इच्छितस्थळी जावे. संचेती चौकातून उजवीकडे वळून स. गो. बर्वे चौक, शिवाजी रस्त्याने इच्छितस्थळी जावे.