पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र बुधवार (दि. 5) पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत. ऑनलाइन प्रवेशपत्र प्रिंट काढून ती विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्राच्या प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात समक्ष जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
शाळांना काय करावे लागणार?
- प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयाच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी लागणार आहे.
- प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयांनी प्रिंट काढून लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा द्यावा.
- फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटा चिकटवून मुख्याध्यापकांचा शिक्का, स्वाक्षरी आवश्यक.