लोणी धामणी – धामणी (ता. आंबेगाव) येथे सोमवतीच्या निमित्ताने कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याची पालखीतून वाजतगाजत शाही थाटात मिरवणूक काढण्यात आली.
सोमवतीचा सूर्योदय ते दुपारी अडीच वाजेपर्यत पर्वकाळ असल्याने सकाळीच वाघे व वीर मंडळीनी गावातून पालखी खंडोबा मंदीरात नेऊन मंदिरातील पंचधातूचे सर्वांगसुंदर खंडोबा.म्हाळसाई व बाणाईचे मुखवटे परंपरागत सेवेकरी भगत मंडळीकडून घेऊन व ते पालखीत ठेवून वाजतगाजत देवमळ्यातील विहिरीवर आणण्यात आले येथील सोमवतीच्या ओट्यावर सोमवतीचे मानकऱ्यांच्या हस्ते खंडोबा-म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्याला सुवासिक चंदन पावडर, गुलाबपाणी व अत्तर मिश्रणाचा लेप दिल्यानंतर शाहीस्नान घालण्यात आले.
यावेळी मुखवट्यावर पाणी घालण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. त्यानंतर अभिषेक व पूजा पार पडल्यानंतर लाऊडस्पिकरवर आरती करण्यात आली यावेळी महिला भाविकांची मोठी गर्दी लक्षणीय होती. आकर्षक फुलांने सजवलेल्या पालखीची गावातील पेठेतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली सदानंदाचा येळकोटचा जयघोष करुन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. पालखीचे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती.