पिंपरी – दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची बाजारांमध्ये गर्दी होत असून, अनेक ठिकाणी होलसेल दरात फटाका खरेदीसाठी रांगा लावल्यचे चित्र पिंपरीत ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.
दिवाळी सणाच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. लहान व अल्पवयीन मुलांकडून कमी आवाजाच्या फटाक्यांना मागणी आहे; तर तरुणांमध्ये आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. तसेच लहान मुलांमध्ये यंदा आपटी बॉम्बची अधिक मागणी आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांची होलसेल दरात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरात फटाके खरेदीसाठी शहराच्या विविध भागांमधून अनेक नागरिक सहकुटुंब पिंपरीतून फटाके खरेदी करत आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या दरात 20 ते 40 टक्के वाढ झाली आहे. तरीदेखील फटाके खरेदीस नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच आपटी बॉम्ब आणि पाऊस या फटाक्यांच्या प्रकारास ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.