वडगाव मावळ – द्रुतगती मार्गावर नव्याने होत असलेल्या बोगद्यांसाठी खोदकाम सुरू आहे. खोदकामातून निघालेल्या गौण खनिजाची वाहतूक करणारी अवजड वाहने सुसाट वेगना ेजात असल्याने या भागातील गावकऱ्यांना याचा धोका वाटत आहे. नागरिकांच्या सोयीकरिता बांधला जात असलेले बोगद्याचे काम आमच्या जीवावर बेतू नये, अशी या भागातील नागरिकांची भावना आहे.
कुरवंडे हे एक छोटे गाव असून मावळ तालुक्यातील हे शेवटचे गाव असल्याने या गावास जोडणारा रस्ता हा अरूद व तीव्र वळणाचा आहे. तसेच या रस्त्यावरून एकाच गावातील नागरिकांची वर्दळ असल्याने लोणावळा – कुरवंडे रस्ता हा कमी दर्जाचा बनविण्यात आलेला आहे. मात्र मागील साधारणत: चार वर्षांपासून या गावातील डोंगराखालून पुणे -मुंबई द्रुतगती मार्गासाठी बोगदा बनविण्याचे काम सुरू आहे. या बोगद्याच्या कामासाठी या गावात मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असून उत्खनन केलेल्या मालाची वाहतूक या रस्त्यावरून रात्रंदिवस सुरू आहे.
माल वाहतूक करणारी ही अवजड वाहने क्षमतेपेक्षा अधिक माल भरून वाहतुकीचे नियम डावलून बेकायदेशीरपणे गौण खनिजाची वाहतूक केली जात आहे. ही अवजड वाहने या छोट्या रस्त्यावरून जात असताना इतर वाहनाला रस्त्यावर जागा शिल्लक राहत नसल्याने थांबावे लागते. त्यात या अवजड वाहन चालक वेगात वाहने चालवत असल्याने या छोट्या व तीव्र वळणाच्या रस्त्यावरून सर्वसामान्याना वाहने चालविणे अवघड झाले आहे. म्हणून ही धोकादायक वाहतूक थांबविण्याची मागणी नागरिक करत आहेत.
याबाबत लोणावळा शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी कुरवंडे ग्रामपंचायत सदस्य अविनाश जाधव, एकनाथ जांभूळकर, अनिकेत शिंदे, नीलेश पनिकर, राजेश जांभूळकर, गणेश मातेरे, जितेंद्र बोरकर, सचिन कडू, मदन मातेरे , नीलेश खिलारे, ज्ञानेश्वर मराठे, रोशन भालेराव, ज्ञानदेव जांभूळकर, अरुण मातेरे, मयूर प्रबळकर, सुनील मातेरे, अमित कदम, शैलेश ओव्हाळ आदि उपस्थित होते.
कुरवंडे ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
या रस्त्यावरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे उखडला झाला असून गावातील लोकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. सुसाट अवजड वाहनांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात पोलिसांकडून कारवाई झाली नाही तर कुरवंडे ग्रामस्थ या कंपनी व त्यांच्या वाहनांच्या विरोधात तीव्र आंदोलन करतील, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. याची प्रत मावळ तहसीलदार यांना देखील दिली आहे.