शिक्रापूर – येथील महादेव मंदिरातील नंदी दूध पीत असल्याबाबत शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे सोशल मीडियावर अफवा प्रसारित झाल्याने शिक्रापुरात अनेक ठिकाणी खळबळ उडाली.
शिक्रापूर येथे शनिवारी (दि. 5) रात्रीच्या सुमारास महादेव मंदिरातील नंदी दूध पीत असल्याची अफवा पसरली. त्यानंतर गावातील सर्व नागरिक व महिलांसह अनेकांनी महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
यावेळी नंदी दूध पीत असल्याने अनेकांनी दूध, चमचा घेत मंदिरात धाव घेतली. मात्र झालेल्या गर्दी मध्ये मूर्तीच्या तोंडाला दुधाचा चमचा धरून ठेवल्यास दुधाचा चमचा वाकडा होत असल्याने दूध खाली जात असल्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नंदी दूध पीत असल्याबाबतची वार्ता सोशल मीडियावर शिक्रापुरात वाऱ्यासारखी पसली. दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन मंदिरात देखील गर्दी झाली.
यावेळी येथे उपस्थित असलेले माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे, भारतीय जनता पार्टीचे नेते राजेंद्र मांढरे, दत्ता कवाद, समीर शेख यांनी येथील गर्दीला शांत करत महादेव मंदिर समोरील नंदीची मूर्ती पूर्णपणे पुसून घेत सर्वांना शांत करत नागरिकांसमोर मूर्तीच्या पुढे दुधाचा चमचा लावून पाहिला असे अनेकवेळा करून देखील मूर्ती कशाच प्रकारे दूध पीत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही घटना खरी नसून अफवा असल्याचे अखेर समोर आले.