ऑकलंड – स्मृती मानधना, पूजा वस्त्रकार यांची भक्कम फलंदाजी व राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी आणि स्नेह राणा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताच्या महिला संघाने येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्वकरंडक ( #CWC22 ) क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली.
भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या कालावधीनंतर संघात परतलेल्या स्मृती मानधनाने दमदार अर्धशतक फटकावले. भरात असलेली शेफाली वर्मा लवकर बाद झाल्यानंतरही स्मृतीने दीप्ती शर्मासह दुसऱ्या गड्यासाठी 92 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
दीप्ती स्थिरावलेली असताना 40 धावांवर बाद झाली. त्यानंतर कर्णधार मितालीसह हरमनप्रीत कौर व रिचा घोष यांनी साफ निराशा केली. त्याचवेळी स्नेह राणानेदेखील संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याचवेळी पूजा वस्त्रकारने आक्रमक फलंदाजी करत 67 धावांची खेळी केली. स्नेह राणा 53 धावांवर नाबाद राहिली. मात्र, या जोडीने संघाला 7 बाद 244 धावांपर्यंत मजल मारून दिली. पाकिस्तानकडून नाश्रा संधू व निदा दर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
India start off their #CWC22 campaign in style 👏
They register a commanding victory against arch-rivals Pakistan 🙌 #PAKvIND pic.twitter.com/s8Di9Dg9qi
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 6, 2022
विजयासाठी 245 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीचा सामनाच करता आला नाही. त्यांचा डाव 43 व्या षटकांत 137 धावांवर संपला व भारताने हा सामना 107 धावांनी जिंकला. पाकिस्तानकडून शिद्रा अमिनने 30, तर डाना बेगने 24 धावांची खेळी केली. त्यांच्या अन्य फलंदाजांना साफ अपयश आले. भारतीय संघाकडून राजेश्वरी गायकवाडने 4 गडी बाद केले. झुलन गोस्वामी व स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. मेघना सिंग व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
मितालीची सचिनशी बरोबरी
भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका अनोख्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. पुरुषांच्या 50 षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने एक विक्रम साकार केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात त्याने सहा विश्वकरंडक स्पर्धा खेळल्या असून, मितालीनेदेखील या सामन्याद्वारे आपल्या कारकिर्दीतील सहाव्या विश्वकरंडक स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
संक्षिप्त धावफलक – भारत महिला संघ – 50 षटकांत 7 बाद 244 धावा. (पूजा वस्त्रकार 67, स्मृती मानधना 52, स्नेह राणा नाबाद 53, दीप्ती शर्मा 40, नाश्रा संधू 2-36, निदा दर 2-45). पाकिस्तान महिला संघ – 43 षटकांत सर्वबाद 137 धावा. (शिद्रा अमिनने 30, डाना बेगने 24, राजेश्वरी गायकवाड 4-31, झुलन गोस्वामी 2-26, स्नेह राणा 2-27, मेघना सिंग 1-21, दीप्ती शर्मा 1-31).